ऊसतोडीच्या उचलीच्या पैशाच्या वादातून तरुणाचे अपहरण, आठ जणांना अटक

ऊसतोडीच्या उचलीच्या पैशाच्या वादातून तरुणाचे अपहरण, आठ जणांना अटक
Share

पिंपरी- दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचे तीन रिक्षा आणि कारमधून आलेल्या काही जणांनी अपहरण केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आंबेठाण येथे घडली. एका ३० वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला. उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस, म्हाळुंगे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेर संशयित आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. ऊसतोडीच्या टोळीच्या उचलीच्या पैशाच्या वादातून हे अपहरण करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

अमोल रामराव राठोड (वय २९), सचिन रामराव राठोड (२५), नीलेश संतोष राठोड (२७), शुभम प्रल्हाद जाधव (२५), संदीप गुलाब राठोड (४२), इंदल थावरा जाधव (४०, सर्व मूळ रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), राजू बापूराव चव्हाण (४४, रा. वरूड बेबी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) आणि संदीप उदयभान जाधव (३२, रा. नाईकनगर तांडा, ता. हदगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली कार, तीन ऑटो रिक्षा तसेच अपहृत व्यक्तीची मोटारसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला अमोल, सचिन आणि नीलेश यांना शिक्रापूर येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यातून अन्य संशयित आणि अपहृत तरुणाबाबत माहिती मिळाली. ऊसतोडीच्या कामासाठी घेतलेल्या उचलीच्या पैशाच्या वादातून तरुणाचे मोटारसायकलसह अपहरण केल्याचं यात समोर आलं. अपहरण करणाऱ्या टोळीचा उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस, म्हाळुंगे पोलिसांनी छडा लावला. यवतमाळ जिल्ह्यात कारवाई करून आठ जणांना अटक केली. यानंतर तरुणाची अवघ्या २४ तासांत सुखरूप सुटका केली.

पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रिया डुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक निरीक्षक कल्याण घाडगे, सहायक फौजदार यदु आढाारी, पोलीस अंमलदार विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, भैरोबा यादव, संतोष काळे, बापूराव सोनपसारे यांनी कारवाई केली.

 

Vedh News