कारवरील कर्ज बंद करून देण्याचे आमिष दाखवून महिलेची सव्वादोन लाखांची फसवणूक

पिंपरी – बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून कारवरील कर्ज बंद करून देण्याचे आमिष दाखवून जुनी सांगवी मधील एका महिलेला दोन लाख २२ हजार ४७४ रुपयांचा गंडा घातला.
श्रुतीक सदानंद कासारे (रा. ओन हाऊस, दत्त मंदिराजवळ, बेलवली, बदलापूर, ठाणे) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ४४ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्च २०२५ पासून २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत जुनी सांगवी येथील द्रोण पार्क, पवारनगर येथे हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला फोन करून आपण एचडीएफसी बँकेच्या बंडगार्डन शाखेतील कर्मचारी असल्याचे भासवले. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून तिचे कारचे कर्ज फोरक्लोज करून देतो, असे सांगितले. या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने आरोपीने सांगितलेल्या विविध खात्यांवर वेळोवेळी एकूण दोन लाख २२ हजार ४७४ रुपये जमा केले.
मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतरही आरोपीने कार कर्ज बंद केले नाही. तसेच पैसे परत मिळावेत यासाठी महिलेने वारंवार संपर्क साधूनही आरोपीने कोणतीही रक्कम परत केली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.






