पुणे – दुबई-अबूधाबी येथे नोकरी करणारा तरुण दिल्लीला जात असताना पुणे विमानतळावर उतरून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने विमाननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मो. अफजल असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत मो. फैसल (रा. मोहल्ला कोटरा, ता. शेरकोट, जि. बिजनौर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की त्यांचा भाऊ मो. अफजल हा दुबई-अबूधाबी येथे नोकरीसाठी राहत होता. ३० जुलै २०२६ रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-284 या विमानाने दिल्लीला येण्यासाठी त्याने बुकिंग केले होते. रात्री ११.१५ वाजता विमान दिल्लीला पोहोचणे अपेक्षित होते.
मात्र, बराच वेळ वाट पाहून देखील अफजल दिल्लीला पोहोचला नसल्याने कुटुंब काळजीत पडले. प्राथमिक माहिती घेतली असता तो पुणे विमानतळावर उतरल्याचे समोर आले. त्यानंतर शोध घेतला असता पुणे विमानतळावरही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच विविध ठिकाणी चौकशी केली; मात्र अफजलचा ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांनी तातडीने तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विमानतळ परिसरातील cctv फुटेज आणि अफजल याच्या मोबाईल लोकेशन द्वारे त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
