ब्रेकिंग न्यूज

कृषिपंपाच्या तांब्याच्या केबल चोरणारा सराईत गजाआड, १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Share

दौंड- कृषिपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला यवत पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मनोज गुलाब बिद (वय ३७ वर्षे, मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या मांजरी फार्म, ता. हवेली) असे या चोरट्याचे नाव आहे.

ग्रामीण भागात शेतातील विहिरी किंवा विंधन विहिरींवर (बोअरवेल) बसवलेल्या कृषिपंपांच्या महागड्या तांब्याच्या केबल्स कापून चोरण्याचे प्रमाण वाढले होते. भंगार बाजारात तांब्याला मिळणाऱ्या मोठ्या दरामुळे चोरटे रात्रीच्या वेळी या केबल्स चोरून त्या जाळायचे आणि तांबे विकायचे.

नाथाची वाडी ता. दौंड येथील मोटोबा तलाव परिसरात ८ ऑगस्ट रात्री ते ९ ऑगस्ट सकाळी दरम्यान शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. यवत पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक करून सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्याला जेरबंद केले. त्याच्याकडून तांब्याची केबल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील दाखल असलेले ३ गुन्हे उघडकीस आले असून चोरीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.