आठवड्यातून एक दिवस दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणी बंद, पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

आठवड्यातून एक दिवस दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणी बंद, पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
Share

पुणे – पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारपासून, म्हणजेच १५ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. उपलब्ध जलसाठा आगामी काळासाठी जपून ठेवण्यासाठी राज्य सरकारने पाणीवापरात कपात करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

यंदा नेहमीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिण्यासाठीचे पाणी पुढील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व महापालिकांना दिल्या आहेत. त्यानुसार पुण्यात आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी स्पष्ट केले.

बांधकामांवर पाणीनिर्बंध घालण्यात आले आहेत. पाण्याची बचत करण्यासाठी बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी ‘एसटीपी’मधून प्रक्रिया केलेले पाणी, बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी वापरावे लागणार आहे. सार्वजनिक आणि खासगी वाहन धुण्याची केंद्रे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहन, अंगण किंवा पदपथ धुण्यासाठीही पिण्याचे पाणी वापरता येणार नाही

शहरात अनधिकृत नळजोड आढळल्यास किंवा त्याबाबत तक्रार मिळाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. गरज भासल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे. पाणीपुरवठ्याबाबत तक्रारींसाठी १८००-१०३०-२२२ या कॉल सेंटर क्रमांकावर किंवा ९६८९९००००२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

ज्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘एसटीपी’ आहेत, त्यांनी ते कार्यान्वित ठेवून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर बागकाम आणि फ्लशिंगसाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घरगुती वापरातील ग्रे-वॉटरचा पुनर्वापर करण्यासही प्राधान्य देण्यात आले आहे. घरातील नळ, फ्लश टाक्या आणि पाइपलाइनमधील गळती तातडीने दुरुस्त करावी. पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊ नयेत, यासाठी फ्लोट व्हॉल्व्ह बसवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Vedh News