पुणे विद्यापीठात गर्ल्स हॉस्टेल परिसरात विद्यार्थीनीशी गैरवर्तन ; दोन विद्यार्थ्यांवर कारवाई

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृह परिसरात विद्यार्थिनीला अडवून तिची चौकशी केल्याच्या प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने दोन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभाग आणि वसतिगृहातील प्रवेश तत्काळ निलंबित केले असून संबंधित विद्यार्थ्यांविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रविवारी मुलींच्या वसतिगृह परिसरात दोन विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीला अडवून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनींनी रविवारी रात्री वसतिगृह परिसरात आंदोलन केले. सोमवारी विद्यार्थिनींनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेऊन संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने दोन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभाग आणि वसतिगृहातील प्रवेश तत्काळ निलंबित केले आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रात्री साडेदहा नंतर काही मुले मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात आल्याचा आरोप करत ३०० हून अधिक संतप्त विद्यार्थिनी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास चतुःशृंगी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. शिक्षण विभागातील प्रमोद राठोड, ओंकार थोरे आणि विजय कांबळे या तीन विद्यार्थ्यांविरोधात एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत तक्रार करण्यात आली आहे.
विद्यार्थिनींनी वसतिगृह परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुरक्षा रक्षक आणि वॉर्डन यांनाही विद्यार्थिनींनी जाब विचारला. वसतिगृह प्रमुख विद्यार्थीनींच्या समस्या समजून घेण्यासाठी येतच नसल्याचा आरोपही विद्यार्थीनींनी केला.
विद्यार्थिनींनी वसतिगृहातील नियमांबाबतही नाराजी व्यक्त केली. मुलींना रात्री दहा मिनिटे उशीर झाला तरी पालकांना फोन करण्यास सांगितले जाते आणि उशीराचे कारण विचारले जाते. मात्र, मुलांना रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरण्याची मुभा असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. मुलांनाही वेळेचे बंधन असावे, अशी मागणी त्यांनी केली.
View this post on Instagram
View this post on Instagram






