पुणे- दोन दिवसांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. एक अपघात महंमदवाडीतील रहेजा विस्टा परिसरात सोमवारी घडला, दुसरा लोहगाव येथील निंबाळकर रस्त्यावर रविवारी तर तिसरा हडपसर उड्डाणपुलावर सोमवारी घडला.
महंमदवाडी येथील रहेजा विस्टा रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास लावंण्या हॉटेलसमोरील रस्त्यावर शिवशंभू महादेव मंदिराजवळ झालेल्या अपघातात हमजा इमरान सरकार (वय २०, रा. पुणे) याचा मृत्य झाला. त्याचा मित्र केस वसीम खान (वय २०, रा. एनआयबीएम, कुबेरा गार्डन, कोंढवा) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हमजा सरकार हा आपला मित्र केस बरोबर दुचाकीवरून रहेजा विस्टा चौकाच्या दिशेने जात होते. त्या वेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात हमजा याचा जागीच मृत्यू झाला, तर केस याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी संबंधित डंपर ताब्यात घेतला असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
लोहगाव येथील निंबाळकर रस्त्यावर समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ३० वर्षीय आयटी इंजिनीअर सौरभ अनंत शेलार (रा. धानोरी जकात नाका, लोहगाव) यांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सौरभ येरवड्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला होते. अवघ्या काही महिन्यांनंतर त्याचा विवाह होणार होता. रविवारी ते बुलेटवरून जात असताना निंबाळकर रस्त्यावर समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
हडपसर उड्डाणपुलावर सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सासवड रस्त्यावरून हडपसरच्या दिशेने मुख्य उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला. यात गणेश दत्तात्रेय वाघमोडे (वय २२, रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी; मूळ गाव सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश मगरपट्टा परिसरात कामाला जात होते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ते दुचाकीवरून कामासाठी निघाले होते. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर वाहनाचे चाक गणेश यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे आणि नीलेश म्हैसाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गणेश यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातामुळे हडपसर उड्डाणपुलासह पुणे-सोलापूर रस्ता आणि हडपसर-सासवड रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.
