पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीचा वाढता काळ कमी करण्यासाठी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास सुमारे १५० गणेश मंडळांना परवानगी नाकारली आहे. यावरून शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आक्रमक झाले असून गणेश मंडळांना घेऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
पुण्यात काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदुषणावरून गणेश मंडळाच्या रस्त्यावरील मिरवणुकीला विरोध केला होता. या विरोधामुळे विद्यानंद बापट यांना मारहाणही सहन करावी लागली. परंतु आता त्यांच्या मागणीला पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, “लोकमान्य टिळक यांनी पुढाकार घेऊन गणेशोत्सव सुरू केला. तेंव्हाचे लोक मोठे होते, त्यांनी एका विचारातून गणेशोत्सव सुरू केला. सगळ्याच उत्सवात गालबोट लागतं का? चुकीच्या प्रथा असतात का? जर असेल तर सुधारण्याचे कार्य राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी केले पाहिजे. प्रथा बंद करून किंवा मिरवणूक बंद करून…अथवा आधी ज्यांना पोलीस परवानगी मिळायची त्यांची परवानगी रद्द करणे गैरसोयीचे आहे. लोकांना याबाबत विचारात घ्यावे लागेल” असे धंगेकर म्हणाले.
गणेश विसर्जनाला अवघे काही दिवसच उरले असताना पुणे पोलीस १५० गणेशमंडळांंना मिरवणूकीसाठी परवानगी देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
