निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरेंचा मुंबईत मोर्चा; मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरेंचा मुंबईत मोर्चा; मोर्चा कधी अन् कुठून निघणार?
Share

मुंबई : केंद्रीय निवडणूक आय़ोगाच्या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने आज (रविवारी) मोर्चा काढण्यात येणार आहे. मतदारांच्या मतांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात गर्जना असे म्हणत ठाकरे बंधूंनी जनतेलाही या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. गुरुवारी काँग्रेस पक्षाने मुंबईत याविषयी आंदोलन केले, तर शुक्रवारी कॉक्रोच जनता पार्टीने शिवाजी पार्क परिसरात याच विषयावर जोरदार आंदोलन केले. रविवारी सकाळी शिवसेना उबाठा आणि मनसे या पक्षांच्या पुढाकाराने मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सर्वसामान्य मतदारांच्या हक्कासाठी असून सर्व राजकीय पक्षांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे बंधूंनी केले आहे.

ठाकरे बंधूंनी हा मोर्चा भायखळा येथून आझाद मैदान असा काढण्याची घोषणा केली होती. मात्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्याचा मार्ग बदलण्याची विनंती केली होती. त्यानुसार, मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. मोर्चात नागरिकांनी तसेच पक्षातील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. दोन्ही पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

Vedh News