ब्रेक फेल झालेल्या ट्रकने डंपर आणि दोन दुचाकींना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू ; मुळशी तालुक्यातील घटना

ब्रेक फेल झालेल्या ट्रकने डंपर आणि दोन दुचाकींना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू ; मुळशी तालुक्यातील घटना
Share

पुणे – भरधाव ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेल्या ट्रकने समोर असलेल्या एका डंपरला आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुळशी तालुक्यातील लवळे फाटा परिसरात शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळशीतील लवळे फाटा येथील उतारावरून एक ट्रक भरधाव वेगात जात होता. अचानक या ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला हा ट्रक उतारावरून सुसाट खाली आला आणि त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका डंपरला तसेच दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या दुर्दैवी अपघातात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अपघातातील इतर गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक मुळशी येथील रुग्णालय तसेच जवळच असलेल्या सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका आणि बचाव पथकाने तत्काळ लवळे फाटा येथे धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवले आणि अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक कोंडी सोडवली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Vedh News