ब्रेकिंग न्यूज

कडक सॅल्यूट!! फक्त मुलीच्या ‘फी’ साठी ती धावली आणि जिंकली! 

Share

बीड – घटना अत्यंत प्रेरणादायी आणि काळजाचे पाणी पाणी करणारी आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि फीसाठी साधी साडी नेसून, पायातील चप्पल काढून हातात धरून धावत ‘अमृत दौड’ मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. धन्य ती माता!

निमित्त होते बीडच्या अंबाजोगाई येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अमृत दौड’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते भाग्यनगर चौकापर्यंत ही मॅरेथॉन होती. या मॅरेथॉनमध्ये तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता. रमाबाई रणवीर यांनीही त्यात भाग घेतला.

त्यांच्याकडे ट्रॅकसूट नव्हता आणि स्पोर्ट्स शूजही तिच्याकडे नव्हते. इतर स्पर्धक तयारीत आले होते. पण रमाबाईकडे साहित्य नसले तरी इच्छाशक्ती होती.अंगावर साधी साडी आणि पायात स्लीपर घालून त्या या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या. वाटेत चप्पल घसरू लागल्यामुळे त्यांनी ती हातात घेतली आणि संपूर्ण शर्यत अनवाणी पायाने पूर्ण केली. त्या बळावरच ती या मॅरेथॉनमध्ये पहिली आली.

पतीच्या निधनानंतर रमाबाई लोकांकडे स्वयंपाकाचे काम करून आपल्या दोन मुलींचे संगोपन आणि शिक्षण करत आहेत. त्यांची एक मुलगी B.Sc. करत असून दुसरी पोलीस भरतीची तयारी करत आहे.

तरुण आणि व्यावसायिक धावपटूंसोबत स्पर्धा करत रमाबाईंनी ही शर्यत जिंकली. त्यांना ३,००० रुपयांचे रोख बक्षीस मिळाले, जे त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आणि पुस्तकांसाठी वापरण्याचे ठरवले आहे.

अदम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही शक्य करू शकतो हे रमाबाई यांनी दाखवून दिले आहे.