शेअर बाजारात चारशे टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष ; महिलेने केली महिलेची ३२ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात चारशे टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष ; महिलेने केली महिलेची ३२ लाखांची फसवणूक
Share

पुणे- शेअर बाजारात तब्बल चारशे टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने दुसऱ्या महिलेची तब्बल ३२ लाख ३० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी पीडित महिलेने नऱ्हे पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी महिला नऱ्हे येथील गोल्ड अंबर सोसायटीमध्ये राहत असून, त्यांनी सोशल मीडियावर शेअर ट्रेडिंग संदर्भातील एक आकर्षक जाहिरात पाहिली आणि त्यावर क्लिक केलं. जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर ‘मीना राजपूत’ नावाच्या संशयित महिला आरोपीने तक्रारदार महिलेला एका खासगी सोशल मीडिया ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतले. एका विशिष्ट खासगी ॲपच्या माध्यमातून शेअर बाजार किंवा आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीतच अव्वाच्या सव्वा आणि भरघोस परतावा मिळेल, असा विश्वास आरोपींनी त्या महिलेला दिला.

या अमिषाला बळी पडून महिलेने आपल्याकडील जमा केलेली मोठी रक्कम त्या बनावट ॲपमध्ये गुंतवली. मात्र,३२ लाख ३० हजार रुपये गुंतवल्यानंतरही महिलेला कोणताच परतावा हाती आला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. नऱ्हे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Vedh News