अमेरिकेतील मुलाच्या नावाने मेसेज करून पुण्यात निवृत्त प्राचार्याची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक

अमेरिकेतील मुलाच्या नावाने मेसेज करून पुण्यात निवृत्त प्राचार्याची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Share

पुणे- ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांना लुबाडण्याचा नवनवीन प्रकार सायबर चोरट्यांकडून केला जात असल्याचे दिसून येतो. असाच एक नवीन प्रकार करून सायबर गुन्हेगारांनी पुण्यातील एका निवृत्त प्राचार्याला तब्बल ३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या तुमच्या मुलाने कुरिअरने पार्सल पाठवलंय, असे सांगून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांनी २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला. तुमच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने एक महत्त्वाचे पार्सल (कुरिअर) पाठवले आहे, असे सांगून पार्सल डिलिव्हरी आणि प्रक्रियेच्या नावाखाली चोरट्यांनी तक्रारदार ज्येष्ठाच्या दोन्ही मोबाईलमध्ये एक संशयास्पद ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

ॲप डाऊनलोड झाल्यानंतर तक्रारदाराकडून त्यांच्या बँक खात्याचा सर्व गोपनीय तपशील भरून घेतला गेला. भामट्यांनी तक्रारदाराच्या मुलाच्या व्हॉट्सॲपवरून आल्यासारखे वाटणारे बनावट संदेश पाठवून दोन्ही मोबाईल फोन पूर्णपणे हॅक केले आणि त्यांचा रिमोट ॲक्सेस मिळवला. या हॅकिंगच्या मदतीने चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ३,२३,२१९ रुपये लंपास केले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निवृत्त प्राचार्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. कोंढवा पोलीस आणि सायबर सेल या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाऊनलोड करू नये तसेच बँक खात्याची माहिती शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Vedh News