निगडी येथील मंदिरात अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

निगडी येथील मंदिरात अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Share

पिंपरी – निगडी येथील एका मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी मेट्रोच्या उभारणीच्या कामावर कार्यरत असलेल्या एका कामगाराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी संबंधित कामगाराला बेड्या ठोकल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात घडलेला हा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती समोर येताच स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मंदिरासारख्या धार्मिक ठिकाणीही अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निगडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित कामगाराला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध योग्य त्या कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे शहरातील सार्वजनिक आणि धार्मिक ठिकाणी महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रयत्नांची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Vedh News