कोणतीही तोडफोड न करता कारमधून ५० लाख रूपयांची रोकड लंपास ; ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच…..

पिंपरी- मुंबईहून आणलेली ५० लाख रुपयांची रोकड गाडीमध्ये ठेवली. पण पुढच्या काही मिनिटातच रोकड लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी- चिंचवडच्या पुनावळे भागात समोर आला आहे. आश्चर्य म्हणजे गाडीची तोडफोड न करता, काच न फोडता सराईतपणे चोरट्याने ही रक्कम पळवली. मात्र पोलिसांनी आठ तासात आरोपीला अटक केली तेव्हा लक्षात आले की ज्याच्यावर विश्वास ठेवला होता त्यानेच चोरीचा प्लॅन आखला.
कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी अनेकदा विचार करावा याचा प्रत्यय देणारी घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री १०:५० ते १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:१५ च्या दरम्यान पुनावळे भागात संदीप हॉटेलसमोर घडली. याबाबतची माहिती अशी की एका व्यक्तीनं मुंबईमधून ५० लाख रूपयांची रोकड आणली होती. पुण्यात येताच त्याने पुनावळे येथे आपली कार उभी केली. थोड्यावेळाने कार उघडली असता कारमधील ५० लाख गायब झाल्याचेच लक्षात आले. आश्चर्य म्हणजे गाडीची तोडफोड न करता, काच न फोडता सराईतपणे चोरट्याने ही रक्कम पळवली.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे युनिट दोन, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी या घटनेचा चातुर्याने तपास करून आठ तासात या गुन्ह्याचा उलगडा केला. शेवटी जो खुलासा झाला तो ऐकून धक्काच बसला. ही चोरी कोणा सराईत चोरट्याने केलेली नसून फिर्यादीसोबत मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनेच केली होती. म्हणजे ज्याला विश्वासू समजून सोबत नेले होते त्यानेच आपल्या एका साथीदाराच्या मदतीने बनावट चवीचा वापर करून ही चोरी केल्याचे समोर आले. त्यांच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण ५० लाखांची रोकड संशयितांकडून हस्तगत करण्यात आली.





