नाशिक- सध्या राज्यात विविध ठिकाणी असलेल्या आश्रमशाळेमधील विद्यार्थिनींच्या असुरक्षिततेचा मुद्दा समोर येत असताना नाशिक जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील मोहनदरी आदिवासी निवासी आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. उन्हाळी सुट्टीत ती गावी गेल्यानंतर तिच्यावर नात्यातील एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर ती गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करत त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
विभागीय स्तरावरही या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली. या प्रकरणानंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी पालक, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
