सांगवीतील संविधान चौक पाडल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सांगवीतील संविधान चौक पाडल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Share

पिंपरी- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाची प्रास्ताविका (उद्देशिका) कोणत्याही प्रशासकीय परवानगीशिवाय अचानक तोडून जमीनदोस्त करण्यात आली. हे कृत्य अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि संविधानाचा थेट अवमान करणारे असून, याप्रकरणी संबंधित दोषींवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पवित्र पर्वावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या प्रास्ताविकेची मोडतोड करण्यात आली. हे कृत्य कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय करण्यात आल्याचे महापालिकेच्या ‘ह’ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक भाजप नगरसेविका व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा तृप्ती संतोष कांबळे यांनी सामूहिक पद्धतीने हे कृत्य घडवून आणल्याचा आरोप काँग्रेसने पत्राद्वारे केला आहे.

भारतीय संविधान हे १४० कोटी भारतीयांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. महापुरुषांच्या विचारांचा आणि संविधानाचा असा अपमान पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कदापि सहन करणार नाही. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि ‘संविधान चौका’चे पुनर्स्थापन करावे. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नरेंद्र बनसोडे यांनी प्रशासनाला दिला आहे.

Vedh News