छत्रपती संभाजीनगर- समृद्धी महामार्गावर दरोडा टाकून प्रवाशांची लूटमार करणाऱ्या आणखी चौघांना पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. यापूर्वी ७ जणांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणातील आरोपींची संख्या ११ झाली आहे.
आरोपी ओमकार रामचंद्र फसले (वय 22) याला बीड जिल्ह्यातील म्हाळस जवळा येथून अटक केली तर भीमराव उर्फ शहादेव भगवान तांदळे (वय २६), सुनील गणपत चव्हाण (वय २२), सुनील कल्याण शेंडगे (वय २६) या तिघांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल समृद्धी दरोड्याच्या गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील म्हाळस जवळा येथील ओमकार फसले हा चालक आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गावात उघडपणे चौकशी केल्यास आरोपी पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ‘ठेकेदाराचा वेश’ धारण केला.
सोलापूर-धुळे हायवेवर उड्डाणपुलाच्या कामासाठी चांगल्या पगाराचा टिपर चालक हवा असल्याचा बनाव करत पोलिसांनी गावातील एका पानटपरीवाल्याशी बातचीत केली. पानटपरी चालकाने आरोपी ओमकारला फोन करून ठेकेदार आल्याची माहिती दिली. चांगल्या नोकरीची संधी मिळताच ओमकार स्वतःहून पानटपरीवर आला. त्याने स्वतःचे ओळखपत्र दाखवून खात्री पटवताच, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
दुसऱ्या एका पथकाने कायगाव टोका परिसरात सापळा रचून भीमराव उर्फ शहादेव तांदळे आणि सुनील चव्हाण या दोघांना बेड्या ठोकल्या. तर तिसऱ्या कारवाईत, दरोड्यासाठी स्वतःचे वाहन पुरवणारा सुनील शेंडगे याला तिसगाव परिसरातून पकडण्यात आले. आरोपी सुनील शेंडगे हा सराईत गुटखा तस्कर असून, वाळूज येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावर गाडी घालून गुटख्याचा टेम्पो पळवल्याप्रकरणी गेल्या ३ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणातील ७ जणांना अटक केली आहे. आता नव्या ४ आरोपींसह या प्रकरणातील एकूण ११ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा विशेष पथकाने पार पाडली.
