उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी भाजप नेत्याच्या भाऊ पोलिसांच्या ताब्यात

बारामती- उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी करमाळा येथील नवनाथ झोळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. नवनाथ झोळ हे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि भाजप नेते रामदास झोळ यांचे बंधू आहेत.
रामदास झोळ हे भोंदू मनोहर भोसले प्रकरणात आरोपी असून सध्या फरार आहेत. या प्रकरणात रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांना अटक करण्यात आली आहे. नवनाथ झोळ आणि राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण यामागे काही कनेक्शन आहे का याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कर्वेनगर परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीनंतर दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बारामती विमानतळ परिसरात एका धाब्याजवळ रविवारी राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुरुवातीला त्यांच्यावर पिस्तूलातून गोळी झाडण्यात आली. त्यानंतर जॅकेट आणि मास्क घातलेल्या अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या उजव्या हाताच्या दंडाला तसेच पोटाच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






