मेट्रोच्या कामामुळे मार्केटयार्ड, सातारा रोड परिसरातील वाहतुकीत बदल

मेट्रोच्या कामामुळे मार्केटयार्ड, सातारा रोड परिसरातील वाहतुकीत बदल
Share

पुणे – स्वारगेट ते कात्रज दरम्यान भुयारी मेट्रो मार्गाच्या कामामुळे मार्केटयार्ड आणि पुणे-सातारा रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आले आहेत. या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल काल सोमवारपासून (ता. १९) पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

वाहतुकीतील प्रमुख बदल आणि पर्यायी मार्ग –

अप्पर बिबवेवाडीकडून येणारी वाहने – चंद्रलोक चौक मार्गे पुष्पमंगल चौकात येणाऱ्या वाहनांना स्वारगेट तसेच मार्केटयार्ड/उत्सव हॉटेलकडे उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांनी डावीकडे वळून तनिष्क शोरूमसमोरील अरणेश्वर बसस्थानकावरून ‘यू-टर्न’ घेऊन स्वारगेटच्या दिशेने जावे.

पुष्पमंगल चौकातून जाणारी वाहने – पुष्पमंगल चौकाकडून मार्केटयार्ड किंवा उत्सव हॉटेल चौकात उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहन चालकांनी पुढे जाऊन आदिनाथ सोसायटीजवळून ‘यू-टर्न’ घेऊन इच्छित स्थळी जावे.

उत्सव हॉटेल चौकाकडून स्वारगेट – मार्केटयार्ड/उत्सव हॉटेल चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण्यास बंदी असेल. मार्केटयार्डकडून येणाऱ्या वाहनांनी पुष्पमंगल चौक, तनिष्क शोरूम, अरणेश्वर बसस्थानकावरून ‘यू-टर्न’ घ्यावा किंवा वखार महामंडळ चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.

Vedh News