चाकण- चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील कोंडी सोडण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना म्हणून पुणे मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. निगडी ते चाकणनंतर आता चाकण ते राजगुरुनगर आणि तळेगाव ते शिक्रापूर या मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण आणि तळेगाव दौऱ्यादरम्यान या भागातील सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली आणि औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी चाकण ते राजगुरुनगर आणि तळेगाव ते शिक्रापूर – सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्याची घोषणा केली.
हा प्रस्तावित विस्तार नियोजित निगडी-चाकण कॉरिडॉरला जोडून पुढे पुणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांना मेट्रो नेटवर्कद्वारे जोडण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांमध्ये कामगारांसाठी वसाहती विकसित करण्याचाही सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
चाकण-राजगुरुनगर आणि तळेगाव-शिक्रापूर मार्गांच्या व्यवहार्यतेची (feasibility) तपासणी करून त्याआधारे प्रकल्प अहवाल तयार करण्यास महामेट्रोला सांगण्यात आले आहे. औद्योगिक पट्ट्यातील पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष नोडल समिती स्थापन केली आहे. रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, पदपथ, पथदिवे आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी ही समिती दर शुक्रवारी बैठक घेईल.
रस्ते सुधारणेच्या कामांनाही गती मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये ५४ किमीच्या तळेगाव-शिक्रापूर मार्गावरील दुरुस्ती, नाशिक फाटा-राजगुरुनगर रस्त्यातील सुधारणा आणि औद्योगिक क्षेत्रांमधील अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम व बळकटीकरण यांचा समावेश आहे. नवीन रस्ते बांधताना किंवा अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचा दर्जा सुधारताना त्यामध्ये पादचाऱ्यांसाठी मार्ग, सार्वजनिक सुविधा आणि सायकलिंगसाठी स्वतंत्र पायाभूत सुविधांचा समावेश करण्याचे निर्देश शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नियोजित मेट्रो मार्ग आणि विस्तार
निगडी ते चाकण: भक्ती-शक्ती (निगडी) ते चाकण दरम्यानच्या अंदाजे ४१-४२ किमी मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा.
चाकण ते राजगुरुनगर: चाकणपासून पुढे राजगुरुनगरपर्यंत मेट्रो जाळे नेण्याचे नियोजन.
तळेगाव ते शिक्रापूर: औद्योगिक पट्ट्याला जोडण्यासाठी तळेगाव ते शिक्रापूर मार्गाची व्यवहार्यता तपासली जाणार.
