ब्रेकिंग न्यूज

कडाक्याच्या भांडणानंतर पतीने रिव्हॉल्व्हरमधून झाडली स्वतःवर गोळी, पुण्यातील भर वस्तीतील घटना

Share

पुणे- पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पतीने स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत पतीच्या उजव्या हाताला गोळी लागली. ही घटना फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसबा पेठेत आज सोमवारी घडली. जखमी पतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेला वाद इतका तीव्र झाला की, दोघांनीही एकमेकांना गोळी मारण्याबाबत बोलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याच दरम्यान बंदुकीतून गोळी सुटली आणि पतीच्या उजव्या हाताला गोळी लागली. पत्नीने ‘स्वतःवर गोळी झाड’ असे पतीला म्हटले तर ‘पतीने ‘तू मला गोळी मार’ असे म्हटल्याचे कथितरित्या सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग, एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून शस्त्रासह इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. पती-पत्नीमधील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, गोळी कोणी झाडली, शस्त्र कोणाच्या ताब्यात होते आणि गोळीबार नेमका कसा झाला, याचा फरासखाना पोलीस तपास करत आहेत.