‘कुराश’ खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बडतर्फी

‘कुराश’ खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बडतर्फी
Share

पुणे- ‘कुराश’ या खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून राज्य सरकारच्या खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेऊन पोलीस दलामध्ये नोकरी मिळवलेल्या सर्व १९ उमेदवारांना बडतर्फ करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू असून, बनावट प्रमाणपत्रांचे संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे भरती झालेल्या १९ उमेदवारांपैकी १० जणांना अद्याप सेवेत हजर करून घेण्यात आले नव्हते. तर उर्वरित नऊ जणांना विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. मात्र प्रकरण उघडकीस आल्यानंतर या नऊ जणांनाही तातडीने प्रशिक्षण केंद्रातून परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे शहर पोलीस दलाच्या २०२४-२६ मधील भरती प्रक्रियेदरम्यान कुराश आणि ड्रॅगनबोट या खेळांची बनावट प्रमाणपत्रे वापरून १९ उमेदवार भरती झाल्याची गुप्त माहिती एका सजग नागरिकाने पोलिसांना दिली. त्याने संबंधित पुरावेही पोलिसांकडे सादर केले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली.

या प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांच्यासह चौघांना अटक केली आहे. यात क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालकांचाही समावेश आहे. त्यांच्या केंद्रातून बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांनी याबाबत तक्रार दिली आहे. २०१६ ते २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या तपासात २०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीत कुराश खेळाच्या प्रत्यक्ष कोणत्याही स्पर्धा आयोजित न करताच त्या झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर याच बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

Vedh News