……म्हणून नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

……म्हणून नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
Share

पुणे- पुणेकरांची जीवन वाहिनी असलेल्या खडकवासला धरणातील पाणी दूषित होत असल्याचा गंभीर प्रकार दोन दिवसांपूर्वी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी समोर आणला होता. प्रशासनाचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी बालवडकर यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत महापौर आणि महापालिका आयुक्त यांना वॉटर प्युरिफायर भेट दिला. पिण्याच्या पाण्याची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली अमोल बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नगरसेवकांनी या मुद्द्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

खडकवासला परिसरातील गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी, कुडजे आदी गावांमधील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांमधून दूषित पाणी धरणाच्या जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करणे काळाची गरज असून खडकवासला धरण परिसरात नियमित गस्त घालून सांडपाणी कुठून आणि कशा प्रकारे सोडले जाते, याची तपासणी करावी, अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे.

पुणेकरांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, धरणात दूषित सांडपाणी मिसळत असल्याच्या तक्रारीमुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. त्यामुळे या परिसरात नियमित गस्त घालून सांडपाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि व्यावसायिकांना ‘सांडपाणी प्रक्रिया केंद्र’ उभारणे बंधनकारक करावे. राज्य शासन किंवा महापालिकेने संबंधित ग्रामपंचायतींना STP उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बालवडकर यांनी केली.

अमोल बालवडकर म्हणाले की, पुणेकरांना केवळ आश्वासने नकोत, तर शुद्ध पिण्याचे पाणी हवे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या गंभीर मुद्द्यावर प्रशासन केवळ आश्वासने देऊन आपल्या जबाबदारीपासून मागे हटू शकत नाही. त्यांनी तात्काळ ठोस पावले उचलावीत. शुद्ध पिण्याचे पाणी हा नागरिकांचा अधिकार आहे आणि त्यासाठी आवाज उठवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे.

Vedh News