ब्रेकिंग न्यूज

पत्नीला मारहाण करताना अडवणाऱ्या कारचालकाला पोलीस अंमलदाराकडून बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण, पोलीस अंमलदार निलंबित

Share

पुणे – पोलीस अंमलदार पत्नीला मारहाण करत असताना ही भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारचालकाला संबंधित पोलीस अंमलदाराने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. कारचालक तब्बल अडीच महिन्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर त्याने केलेल्या तक्रारीनंतर करमाळा पोलिसांनी अंमलदाराच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली. या पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

अमित सुरेश जाधव (वय ४२, रा. भवानी पेठ) असे निलंबित केलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याबाबत शुभम चंद्रकांत भोसले (वय २७,रा. मंगळवार पेठ) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भोसले हे चालक म्हणून काम करतात. ३१ मे २०२६ रोजी ते, त्यांचा मित्र प्रथमेश चव्हाण यांची इर्टिका गाडी घेऊन अमित जाधव यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी, आई, बहिण व दोन मुलांसह देवदर्शनासाठी गेले होते. काही ठिकाणी फिरुन रात्री साडेनऊ वाजता ते करमाळा एस टी बसस्थानकाजवळ चहा, नाष्टा करण्यासाठी थांबले. यावेळी काही कारणावरून अमित जाधव याने चिडून पत्नी, आई आणि बहिणी सोबत शिवीगाळ करु लागला. पत्नीला मारहाण करु लागला.

शुभम व त्याचा भाचा प्रथमेश यांनी भांडणे सोडवण्याचा खूप वेळ प्रयत्न केला. परंतु, अमित ऐकत नव्हता. अमित याने रागाच्या भरात शुभम यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन शिवीगाळ केली. बाजुला पडलेल्या झाडाच्या काठीने शुभम यांना मारहाण केली. शुभमच्या डोक्यात काठी मारल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध पडले. करमाळा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तब्बल ४१ दिवस उपचार केल्यानंतर ११ जुलै २०२६ रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

त्यानंतर त्यांची तब्येत बरी होत नसल्याने त्यांना घरच्यांनी कर्वेनगर येथील जीवनधारा न्युरो केअर सेंटरमध्ये अ‍ॅडमिट केले. ते हळु हळु पूर्णत: शुद्धीवर आले. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी त्यांचा जबाब नोंदवुन तो करमाळा पोलीस ठाण्यात पाठविला. करमाळा पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी अमित जाधव याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर २२ ऑगस्ट २०२६ रोजी करमाळा पोलिसांनी अटक केली.

अमित जाधव यांचे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे, अशोभनीय असल्याने पोलीस उपायुक्त पी आर पाटील यांनी त्याला निलंबित केले आहे.