पुणे – पुण्यात अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई झाली असून दिल्लीहून पुण्यात आलेल्या मिझोराममधील महिलेकडून तीन कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुणे रेल्वे स्थानकात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेकडून (डीआरआय) ही कारवाई करण्यात आली.
लालरे मलियानी (वय ३२, रा. ऐझाॅल, मिझोराम) असे या महिलेचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकातून निघालेल्या स्वर्णजयंती एक्सप्रेसमधून मलियानी प्रवास करत होती. तिच्याकडे अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती ‘डीआरआय’मधील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (ता.२५ ) पहाटे पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन परिसरात सापळा लावण्यात आला. महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मलियानी हिच्याकडील पिशवी, तसेच साहित्याची तपासणी करण्यात आली.
तेव्हा तिच्याकडील पिशवीत दोन हजार ५३२ ग्रॅम स्फटिकासारख्या दिसणाऱ्या गोळ्या सापडल्या, तसेच विविध रंगाच्या गाेळ्या सापडल्या. अमली पदार्थ नार्कोटिक्स डिटेक्टशन किटद्वारे तपासणी करण्यात आली असता तपासणीत मलियानीने अमली पदार्थ बाळगल्याचे उघडकीस आले. तिच्याकडून ॲम्फेटामाइन, क्रिस्टल मेथ, एमडीएमए अशा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत तीन कोटी ४१ लाख रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अशिमा नावाच्या एका आफ्रिकन व्यक्तीने हे अमली पदार्थ दिले होते. रेल्वे तिकिटाची व्यवस्था त्याने केली होती. म्हैसूरला पोहचल्यानंतर अमली पदार्थांची पिशवी एका व्यक्तीला देण्याची सूचना अशिमाने महिलेला दिली होती, असे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. आरोपी महिलेला विशेष न्यायालयाने ‘डीआरआय’च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईनंतर अमली पदार्थ तस्करीचे आंतरराज्यीय जाळे उघडकीस येण्याची शक्यता ‘डीआरआय’मधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
