ब्रेकिंग न्यूज

भटक्या कुत्र्यांसाठी पुणे महापालिका देणार दररोज १०३ रुपये

Share

पुणे- पुणे महानगरपालिका सर्वोच्च न्यायालयाच्या आणि ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शहरातील खासगी श्वान निवारा केंद्रांना (डॉग शेल्टर) प्रत्येक भटक्या कुत्र्याच्या देखभालीसाठी दररोज १०३ रुपये देणार आहे. शहरातील भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पुणे महापालिकेने ऍनिमल वेल्फेअर संस्थांच्या सहकार्याने खासगी शेल्टरची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना जखमी केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या श्वानांच्या नियंत्रणासाठी पुणे महापालिका काही काम करते की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता पुणे महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाने खासगी शेल्टरची व्यवस्था करण्यासाठी जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे.

महापालिका हद्दीमध्ये किंवा हद्दीबाहेर स्वतःच्या किंवा भाडेतत्त्वावरील जागेमध्ये शेल्टर उभारून भटक्या श्वानांच्या देखभालीसाठी ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया मान्यताप्राप्त संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. शेल्टरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या प्रत्येक श्वानासाठी प्रतिदिन १०३ रुपये देण्यात येणार आहेत.

एका शेल्टरमध्ये जास्तीत जास्त १०० भटक्या कुत्र्यांना ठेवण्याची मर्यादा असेल. पात्र व इच्छुक संस्थांना ५ वर्षांच्या कालावधीसाठी हे शेल्टर चालवण्याची जबाबदारी दिली जाईल. संस्थांकडे ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे वैध प्रमाणपत्र, योग्य जागेची कागदपत्रे आणि सीसीटीव्हीसह मोबाईल ॲपवर दैनंदिन नोंद ठेवणे बंधनकारक असणार आहे.