ब्रेकिंग न्यूज

नागा साधू असल्याची बतावणी करून कारचालकाची पळवली अंगठी, मोरवाडी भागातील घटना 

Share

पिंपरी – लिफ्ट मागून कारमध्ये बसलेल्या एका भोंदू साधूने आपण नागा साधू असल्याचे भासवून एका कारचालकाची सोन्याची अंगठी लांबवली. हा प्रकार पिंपरी चिंचवड मधील मोरवाडीमध्ये शनिवारी (दि. २२) दुपारी १ च्या सुमारास घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ४९ वर्षीय इसम आपल्या कारमधून मोरवाडी येथील आयुक्त कार्यालयाच्या समोरून जात असताना भगवे कपडे घातलेल्या अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितली. कारमध्ये बसल्यावर आपण नागा साधू असल्याचे भासवून आशीर्वादाने भरभराट होईल असे सांगून कारचालकाचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर हातातील अंगठी काढून डोळ्याला लावून गियर जवळ ठेवा असे सांगितले. कारचालकाने त्याच्यावर विश्वास ठेवून अंगठी काढून ठेवली. त्यानंतर कारचालकाची नजर चुकवून या भामट्याने हातचलाखीने अंगठी लंपास केली.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.