ब्रेकिंग न्यूज

सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात रुपाली चाकणकर यांची तक्रार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Share

पुणे – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचवल्याच्या आरोपावरून अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांसह १९ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

रुपाली चाकणकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार उबाठाच्या सुषमा अंधारे , राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे, अभिनेत्री दिपाली सय्यद, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी, डॉ. आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांच्यासह तब्बल १९ जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोशल मीडिया सेलचे योगेश सावंत, मोहसीन शेख तसेच महादेव बालगुडे यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

फिर्यादीत नमूद केलेल्या माहितीनुसार, भोंदू अशोक खरात याच्याशी रुपाली चाकणकर यांची ओळख एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने तेथे उपस्थित राहिल्या होत्या. दरम्यान, खरात याला अटक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, त्याच्यासोबतचे जुने छायाचित्र आणि व्हिडिओ समाज माध्यमावर जाणीवपूर्वक प्रसारित करून खोटे व बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विविध डिजिटल व्यासपीठांवरून बदनामीकारक मजकूर, शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. तसेच कमेंट्सच्या माध्यमातून अश्लील भाषा वापरून लैंगिक छळवणूक व मानहानी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या संदर्भातील सर्व डिजिटल पुरावे व स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे सोपवण्यात आले असून, पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील चौकशी सुरु केली आहे.