ब्रेकिंग न्यूज

गणेशोत्सवात पुणेकरांच्या छातीत धडकी नको, हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

Share

पुणे – गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या उत्सवातील भक्ती, श्रद्धा आणि मांगल्य टिकवून ठेवताना नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. डीजे, लेझर बीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन यंदा या गोष्टींचा वापर पूर्णपणे टाळावा. गणेशोत्सवात पुणेकरांच्या हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी भरता कामा नये, अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून गणेश मंडळांना आवाहन केले आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर लोकमान्य टिळकांच्या विचारांचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. या उत्सवाचे पावित्र्य टिकवताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. डीजे आणि लेझर बीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, रक्तदाबाचे रुग्ण, लहान मुले तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या वापराला भक्तिभावाने काम करणारा कोणताही संवेदनशील गणेश मंडळाचा कार्यकर्ता पाठिंबा देणार नाही, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

गणेशोत्सवात पूर्वी काही अनुचित प्रथा शिरल्या होत्या. त्या दूर करून भक्ती आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच ढोल-ताशा पथके आणि गणेश मंडळांसमोर सामुदायिक अथर्वशीर्ष पठणासारख्या चांगल्या प्रथा रुजल्या, असे पाटील यांनी पत्रकात नमूद केले.

कार्यकर्ता हा समाजाचाच घटक असल्याने नागरिकांच्या त्रासाची त्याला जाणीव आहे. कोरोना काळात कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी विसर्जन मिरवणूक रद्द करण्याची दाखवलेली सकारात्मक भूमिका लक्षात घेता, यंदाही निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येकाची सर्वांचीच आहे, असे पाटील म्हणाले.