पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे- भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात पुणे- सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत जुडिओ शोरूमसमोर २८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास,घडला.
अनयकुमार उदयकुमार चौधरी (वय २१ वर्षे), हा मृत्यूमुखी पडला असून त्याचा मित्र अनय मंगेश कामदेव (वय २१, दोघे रा. शेवाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी अनय कामदेव यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेची माहिती अशी की कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जुडिओ शोरूमसमोर, सोलापूरकडून पुणेकडे जाणाऱ्या लेनवरुन अनय कामदेव आणि त्यांचा मित्र अनयकुमार चौधरी हे दोघे दुचाकीवरून जात असताना, एका अज्ञात चालकाने निष्काळजीपणे टँकर चालवून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिली.
या भीषण धडकेत अनयकुमार याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर फिर्यादी अनय हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर आरोपी टँकरसहित घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप हे करत आहेत.






