बारामती मधील दोन वृद्ध महिलांच्या हत्येचे गूढ उलगडले, चुलत नातू पोलिसांच्या ताब्यात; हत्येचे कारण आले समोर

बारामती- बारामती तालुक्यातील बाबुर्डी (शेरेवाडी) येथे घडलेल्या खळबळजनक दुहेरी हत्याकांडात सुपे पोलिसांनी केवळ सात दिवसांत गूढ उलगडले असून, मृत महिलांच्या २६ वर्षीय चुलत नातवाला अटक केली आहे.
विकास राजेंद्र लडकत (वय २६, रा. शेरेचीवाडी, बारामती) असे या संशयित आरोपीचे नाव असून, कर्ज आणि आर्थिक विवंचनेमुळे त्याने चोरीच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी २९ सप्टेंबरला इंदूमती लडकत (वय ७५ वर्ष) आणि कृष्णाबाई लडकत (वय ५५) यांची निर्घृण हत्या झाली होती. हत्येनंतर त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. त्यामुळे चोरीच्या उद्देशानेच ही हत्या झाल्याचा संशय होता.
संशयित आरोपी विकास याच्यावर बँक आणि फायनान्स कंपनीचे कर्ज आहे. या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे त्याने पैशाची गरज भागवण्यासाठी दोन्ही आजींच्या घरात चोरी करण्याचा प्लॅन आखला. तो घरात चोरीचा प्रयत्न करत असताना दोन्ही आजींना जाग आली. आपली ओळख उघड होण्याची भीतीने त्याने दोघींवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना संपवल्याचा संशय पोलिसांना आहे.
हत्या केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड आणि रक्ताचे डाग पडलेले कपडे जवळच्या विहिरीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनास्थळी सीसी टीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे या गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी गुप्त खबऱ्याच्या नेटवर्क मधून स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यांची उकल केली. पोलिसांनी संशयिताकडून चोरीचा काही सोन्याच्या वस्तू हस्तगत केल्याची माहिती आहे. सुपे पोलीस पुढील तपास करत आहेत.





