पुणे- देशभरात गाजलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात केलेल्या तपासातून अनेक नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरोपी सिया गोयल हिने केतन अग्रवाल याला जीवे मारण्यासाठी अनेक मार्गाचा अवलंब केल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी अनेक गोष्टी इंटरनेटवर सर्च केल्या होत्या. अशातच पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा पुरावा लागला असून मशरूमने केतनला संपवण्याचा प्लॅन होता, असंही चार्जशीटमधून समोर आल्याचे पहायला मिळत आहे.
सिया गोयलने केतनला जीवे मारण्यासाठी जेवणातून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, असं तपासातून समोर आलं आहे. केतनला मारण्यासाठी सियाने मशरूमचा वापर करण्याचा प्रयत्न केला त्यासाटी तिने चॅटजीपीटीवर काही गोष्टी सर्च केल्याचं तपासातून समोर आलं आहे. ‘Mushroom use woman kill family by mushroom’ त्याचबरोबर ‘Is it easy to kill someone’ या टर्म सियाने सर्च केल्या होत्या. मशरूम किंवा इतर अन्नपदार्थाच्या माध्यमातून केतनला संपवण्याचा स्वतंत्र प्रयत्न अथवा कट होता का? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय. पोलिसांच्या हाती लागलेला हा पुरावा सियासाठी आणखीन अडचणींचा ठरणार आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरण
पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या खुनाचा कट त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरी आणि त्याचा मित्र रितेश हंगे यांच्यासोबत मिळून रचला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या ५,०५३ पानांच्या आरोपपत्रात या भीषण हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे.
१८ जून २०२६ रोजी ठरल्याप्रमाणे सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. सियाचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच दुसऱ्या मार्गाने किल्ल्यावर पोहोचला होता आणि सियाकडून मिळणाऱ्या सिग्नलची वाट पाहत दबा धरून बसला होता. किल्ल्यावरील एका निर्जन आणि धोकादायक कड्यावर पोहोचल्यावर, जेव्हा केतनचे लक्ष दुसरीकडे होते, तेव्हा सियाने मागून जाऊन तिच्या दोन्ही हातांनी केतनला जोरदार धक्का दिला. त्याच क्षणी तिथे दबा धरून बसलेल्या चेतन चौधरीने धावत येत केतनला लाथ मारली, ज्यामुळे केतन थेट ३५० ते ४०० फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर सियाने हा केवळ एक ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. हत्येनंतर केतनच्या कुटुंबीयांसमोर आपण खूप दुःखात आहोत हे दाखवण्यासाठी सियाने ‘दुःख कसे व्यक्त करावे’ (How to express grief) आणि अधिक व्याकुळ कसे दिसावे, यासाठी ChatGPT आणि गुगलवर सर्च केल्याचे पोलिसांच्या तांत्रिक तपासणीत समोर आले आहे.
