पुणे- वाकड येथील शिल्पा सचिन गवारे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, तपासाचा भाग म्हणून नुकतेच घटनास्थळी ‘क्राईम सीन रिक्रिएशन’ करण्यात आले आहे. सासरच्या जाचाला कंटाळून शिल्पाने रक्षांधनाच्या आदल्या दिवशी आत्महत्या करत जीवन संपवल्याचे सुरुवातीला समोर आले होते; मात्र, तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
शिल्पा गवारे यांचा विवाह वाकड परिसरातील उच्चभ्रू आणि सधन गवारे कुटुंबात झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुरळीत पार पडल्यानंतर सासरच्या मंडळींकडून शिल्पा यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. तुझ्या माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये असलेला तुझा हिस्सा मागून घे, असा तगादा पती आणि सासरच्या लोकांनी तिच्यामागे लावला होता. माहेरून संपत्ती आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. केवळ पैशांच्या मागणीसाठी तिला वारंवार मारहाण आणि शिवीगाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.
माहेरच्यांनी हत्येचा आरोप केल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. मृत्यूच्या दिवशी आणि त्याआधीचे काही तास नेमका काय घटनाक्रम घडला, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि क्राईम सीन रिक्रिएशन केले. यातून आरोपींच्या जबाबातील सत्यता आणि विसंगती पडताळून पाहिली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस या मृत्यूमागील नेमके सत्य शोधून काढत आहेत.
