ब्रेकिंग न्यूज

लहान मुलाच्या डोळ्यादेखत तरुणावर चाकूचे सपासप वार, भोर तालुक्यातील थरारक घटना

Vector illustration in HD very easy to make edits.
Share

पुणे- पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा गावात एका तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या थरारक हत्येचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजगड पोलिसांनी तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले.

महिला आणि एका लहान मुलासोबत पायी चालत जाणाऱ्या तरुणावर मागून दबा धरून आलेल्या हल्लेखोराने अचानक त्याच्यावर झडप घातली. काही कळण्याच्या आतच त्याने हातातील धारदार चाकूने तरुणावर एकामागोमाग एक सपासप वार केले. या घटनेत संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हल्ला करून पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या हल्लेखोराचा स्थानिकांनी पाठलाग सुरू केला. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पथकही घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे हल्लेखोराला पकडण्यात यश आले. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जुना वाद, पूर्ववैमनस्य किंवा अन्य काही कारण आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. राजगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.