पुणे- एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली, या हल्ल्यात गर्लफ्रेण्ड देखील गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी (दि. ७) हिंजवडी परिसरात घडली.
सागर गायकवाड असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे तर दिनेश महादेव झांबरे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हिंजवडीतील एका पीजीमध्ये सागर गायकवाड हा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री संबंधित प्रेयसी एका महिन्यासाठी पीजीमध्ये राहण्यासाठी आली होती. तिने पीजी चालकाला सागर हा आपला प्रियकर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सागरने तिला तिसऱ्या मजल्यावरील ३१० क्रमांकाची खोली राहण्यासाठी उपलब्ध करून दिली.
गुरुवारी दुपारी आरोपी दिनेश महादेव झांबरे पीजीमध्ये आला. त्याने सागरला भेटायचे असून निकिता ही माझी प्रेयसी असल्याचे सांगितले. सागर तिसऱ्या मजल्यावर असल्याचे समजताच दिनेश थेट तिसऱ्या मजल्यावर गेला. काही वेळेतच तिसऱ्या मजल्यावरून आरडा ओरडा ऐकू आला. पीजीमधील कर्मचारी आणि इतर रहिवासी तातडीने धावत वर पोहोचले असता दिनेश सागरवर लोखंडी रॉडने वार करत होता. या हल्ल्यामध्ये सागर गायकवाड रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. हल्ला थांबवण्याच्या प्रयत्नात प्रेयसी देखील गंभीर जखमी झाली.
या हल्ल्यात सागर गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
