कराडमध्ये संशयित आरोपीना घेऊन जाणारी पोलीस व्हॅन जळून खाक ; व्हॅन मधील सर्वजण सुरक्षित

कराड – कराड शहरात संशयित आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना आज शनिवारी संध्याकाळी ७ वाजता कराड शहरातील मुख्य भेदा चौक येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, रेठरे (ता. कराड) येथील मारामारीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना कराड न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांना पोलीस व्हॅनमधून सातारा जिल्हा कारागृहात नेले जात होते. या व्हॅनमध्ये ५ ते ६ संशयित आरोपी आणि ४ ते ५ पोलीस कर्मचारी प्रवास करत होते. पोलीस व्हॅन कराड शहरातील भेदा चौक परिसरात आली असताना अचानक व्हॅनला आग लागली. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळानी व्हॅन लपेटली गेली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अंमलदार शहाजी चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत व्हॅन तातडीने मोकळ्या जागेत उभी केली. व्हॅनमधील पोलीस कर्मचारी आणि आरोपींना त्वरित खाली उतरवले. त्यानंतर काही वेळातच ही व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे भेदा चौकात खळबळ उडाली. भर चौकात पोलीस व्हॅनला आग लागल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.






