ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा, मारुती भापकर यांची मागणी 

Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा बसवावा अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे. 

या बाबतचे पत्र त्यांनी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांना दिले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या मुद्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्टीत भव्य दिव्य पुतळा ऑटो क्लस्टर समोर नव्याने बांधण्यात येत असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर उभारण्यात यावा. सर्व कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हे ऐतिहासिक महत्त्वाचे काम आपल्याच कालखंडात व्हावे. ­

तसेच मुख्यालयातील प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाळ अर्पण करून, महाराजांना नम्र मुजरा करून कामाची सुरुवात करता येईल. पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर महाराजांना अभिवादन करूनच पदाधिकारी आपल्या कामाची सुरुवात करतील.

तरी आपण हा अत्यंत महत्त्वाचा व आपल्या अस्मितेचा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने या विषया संदर्भात योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे काम होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी मागणी भापकर यांनी केली आहे.