ब्रेकिंग न्यूज

अल्पवयीन आरोपीची धिंड काढल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

Share

पुणे- हत्या प्रकरणातील अल्पवयीन संशयित आरोपींना पोलिसांच्या गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात त्यांची धिंड काढणे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना खूप महागात गेले आहे. या प्रकरणी मानसिंग पाटील यांची तडकाफडकी विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीला पोलिसांच्या गाडीच्या बॉनेटला बांधून सार्वजनिकरित्या धिंड काढली होती. याचा व्हिडिओ सोसहल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. अल्पवयीन आरोपीची ओळख उघड होईल असे कृत्य करणे हे बाळ न्याय कायदा आणि मानवी हक्कांच्या विरोधात असल्याची टीका करण्यात आली होती.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली. पुण्याचे पोलीस आयुक्त, संबंधित पोलीस उपयुक्त तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आयोगाने नोटीस बजावत सविस्तर अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले. बुधवारी मानवाधिकार आयोगाचे पथक भारती पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली. संबंधित कागदपत्रे तपासून या घटनेशी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

या चौकशीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची विशेष शाखेत तडकाफडकी बदली करण्यात आली. दरम्यान मानवाधिकार आयोगाची अद्याप चौकशी सुरु असून आयोगाच्या अंतिम अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर आणखी प्रशासकीय किंवा शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.