उद्योगनगरीत एमबीबीएस महाविद्यालय सुरु करण्याची मागणी ; आमदार महेश लांडगे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

उद्योगनगरीत एमबीबीएस महाविद्यालय सुरु करण्याची मागणी ; आमदार महेश लांडगे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Share

पिंपरी- वेगाने वाढत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाशी संलग्न शासकीय किंवा महापालिकेचे एमबीबीएस महाविद्यालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्र पाठवले आहे. 

आमदार लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ४० लाखांपर्यंत पोहोचली असतानाही शहरात एकही सरकारी किंवा महापालिकेचे ‘एमबीबीएस’ (MBBS) वैद्यकीय महाविद्यालय नाही. वायसीएम रुग्णालयाशी संलग्न संस्थेत सध्या एमडी (MD) आणि एमएस (MS) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहेत; मात्र एमबीबीएस शिक्षणासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना पुणे शहर, इतर जिल्हे किंवा महागड्या खासगी संस्थांवर अवलंबून राहावे लागते.

सध्याच्या काळात खासगी वैद्यकीय शिक्षणाचा वाढता खर्च मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना पेलणे अत्यंत कठीण झाले आहे. काही खासगी संस्थांमध्ये साडेचार वर्षांचे शिक्षण शुल्क, निवास व इतर खर्च मिळून सुमारे १.४८ कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) नियमांनुसार एमबीबीएसचे शिक्षण परवडणाऱ्या दरात मिळणे गरजेचे असताना हा खर्च सर्वसामान्य कुटुंबाला परवडणारा नाही.

महाविद्यालयासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ठोस प्रस्ताव अद्याप तयार झालेला नसल्याने, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, नगरविकास विभाग आणि पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जागा, आर्थिक तरतूद, आवश्यक मनुष्यबळ आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषांनुसार कालबद्ध प्रस्ताव तयार करून शासनाने त्याला तातडीने मान्यता व निधी द्यावा. शहरात सरकारी एमबीबीएस कॉलेज सुरू झाल्यास गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण मिळेल आणि पिंपरी-चिंचवडच्या आरोग्य व्यवस्थेला मोठा हातभार लागेल, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

Vedh News