ब्रेकिंग न्यूज

मातीच्या सुगंधात झळकली कविता – म.सा.प. भोसरी शाखेचा उपक्रम

Share

भोसरी – महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखेच्या वतीने आयोजित शेतीमाती कविता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 200 कवींनी सहभाग नोंदवला होता. कवितांचे परीक्षण सुप्रसिद्ध कवी भरत दौंडकर यांनी केले.

समारंभात सुपर संभाषण क्लासेस चे उद्घाटन करण्यात आले. या क्लासेसचे संचालन व्याख्याते प्रा. दिगंबर ढोकले आणि दिनकर मुंडे करणार आहेत. यावेळी प्रा. दिगंबर ढोकले लिखित “वक्तृत्वासाठी विचारधन – सूत्रसंचालनाचे अंतरंग” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक व्याख्यान आणि सूत्रसंचालनासाठी उपयुक्त ठरणारे असल्याचे मत डॉ. वाघ यांनी व्यक्त केले. तसेच, प्रतीके व प्रतिमांचा वापर करून कविता लेखनाची पद्धत त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केली.
या सोहळ्यात पारितोषिक विजेत्या कवींनी आपल्या रचना सादर केल्या व श्रोत्यांची वाहवा मिळवली.
स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे
प्रथम पाच
* १. शितल गाजरे
* २. ⁠मिलिंद कांभेरे
* ३. ⁠दत्तात्रय जगताप
* ४. ⁠ऐश्वर्या नेहे
* ५. ⁠मनोहर मोहरे

*उत्तेजनार्थ*
* ६. ⁠इंद्रजित पाटील
* ७. ⁠भाऊ गोसावी
* ८. ⁠वत्सला पवार
* ९. ⁠विशाल कुलट
* १०. ⁠प्रकाश पाटील
विजेत्यांना रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात आले.
कवी भरत दौंडकर यांनी मसाप भोसरी शाखेच्या कार्याचे कौतुक करताना, “शेतीमाती कवितेचे आयोजन करून संयोजकांनी आपली नाळ मातीशी जोडली आहे” असे सांगितले. भोसरी शाखा नेहमीच भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करते, असेही त्यांनी नमूद केले.

समारंभाला जेष्ठ नगरसेवक वसंत नाना लोंढे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी नगरसेविका प्रियंका बारसे, मासाप भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, झोन चेअरमन मुकुंद आवटे, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. अनु गायकवाड, उद्योजक अरुण इंगळे, व्याख्याते राजेंद्र घावटे, उद्योजक भगवान पठारे, आदर्श शिक्षक प्रा. विलास वाळके तसेच विविध मान्यवर, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर साठे व दिनकर मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले, तर आभार मुकुंद आवटे यांनी मानले