कोल्हापुरात केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती ; प्रियकराने प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

Share

कोल्हापूर- एकीकडे राज्यभरात केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरु असतानाच कोल्हापुरात एक अमानुष घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका २१ वर्षीय तरूणीची तिच्या प्रियकराने कड्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तरन्नुम बशीर नाईक (वय २१) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून श्रीपाद दिनकर वडर (वय २५) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गारगोटी येथील शिवाजीनगर परिसरात राहणारी तरन्नुम गडहिंग्लज महागाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत होती. तिचे शेजारी राहणारा संशयित श्रीपाद दिनकर वडर याच्याशी मागील साडेपाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, तरन्नुम हिचे दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरले. त्यामुळे तिने श्रीपादला भेटणे टाळले आणि जुने प्रेमसंबंध संपवल्याचे स्पष्ट सांगितले.

याच रागातून श्रीपादने ९ ऑक्टोबर रोजी तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने नाईकवाडी धबधब्याच्या धोकादायक कड्यावर नेले आणि तिथे वाद झाल्यानंतर तिला खोल दरीत ढकलून दिल्याचा संशय आहे. हत्येनंतर संशयित श्रीपाद याने स्वतः भुदरगड पोलीस ठाण्यात हजर होऊन मी पाणी आणण्यासाठी गेलो असता प्रेयसी बेपत्ता झाली, असा बनाव रचला. मात्र, भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाला त्याच्या विधानांवर संशय आला.

पोलिसी खाक्या दाखवताच त्याने विवाह ठरल्याच्या रागातून तरन्नुमला कड्यावरून ढकलून खून केल्याची स्पष्ट कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी अपहरणाचा आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने तरूणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, संशयित आरोपी आणि त्याचे कुटुंबीय राजकीय नेत्यांच्या जवळचे असल्याच्या चर्चा असल्याने तपासात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा देत ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. तर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल, त्यासाठी कसून तपास चालू असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी दिली आहे.

Vedh News