पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई ! ८ आस्थापनांमधून तब्बल ५९ लाखांचे असुरक्षित खाद्यतेल जप्त

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई ! ८ आस्थापनांमधून तब्बल ५९ लाखांचे असुरक्षित खाद्यतेल जप्त
Share

पुणे- अन्न व औषध प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली असून, ८ आस्थापनांमधून सुमारे ५८ लाख ९० हजार रुपये किमतीचे ३४ हजार ४८१ किलो संशयित असुरक्षित आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल जप्त केले आहे. जप्त केलेले तेल निकृष्ट दर्जाचे, असुरक्षित किंवा चुकीचे लेबल लावलेले असल्याचा संशय आहे. या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

शुक्रवारी (दि. ९) बारामती, चाकण, जुन्नर तालुक्यातील आळे, मुळशीतील जांबे, देहू, पुणे कॅम्प, गुलटेकडी आणि शुक्रवार पेठ येथील खाद्यतेल उत्पादक व विक्रेत्यांच्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत सोयाबीन, पामोलिन, शेंगदाणा, राईस ब्रान आणि सूर्यफूल तेलाचा साठा जप्त करण्यात आला.

तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये प्रयोगशाळा कार्यरत नसणे, प्रशिक्षित केमिस्ट उपलब्ध नसणे आणि वापरलेल्या तेलाच्या डब्यांचा पुन्हा वापर करणे अशा त्रुटी आढळून आल्या. काही ठिकाणी तेलाच्या टाक्यांसाठी आतील आणि बाहेरील एकच पाइपलाइन वापरली जात असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय उत्पादनांचे लेबलिंग, उत्पादन नोंदी, साठ्याची नोंदवही आणि बॅचनिहाय गुणवत्ता तपासणीच्या नोंदींमध्येही अनियमितता आढळल्या.

कॅम्पमधील गवळी वाडा येथील गार्डन वडापाव सेंटरमध्ये ३५८.४ किलो फिल्टर केलेले शेंगदाणा तेल आढळले. त्याची किंमत ७१,९१८ रुपये आहे. हे तेल निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय एफडीएने व्यक्त केला. तसेच, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमातील कलम २३, २६ आणि २७ चे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले.

गुलटेकडी मार्केट यार्ड येथील ४२३ क्रमांकाच्या प्रज ट्रेडर्समधून ३,१७६.८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल आणि पामोलीन तेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे ६.३५ लाख रुपये आहे. या आस्थापनातील प्रयोगशाळा कार्यरत नसल्याचे आणि रसायनशास्त्रज्ञाची नियुक्ती नसल्याचे तपासणीत आढळल्याचे सांगण्यात आले. येथील तेलही निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय आहे.

शुक्रवार पेठेतील मंडईजवळील ६८८ क्रमांकाच्या श्री रामकृष्ण ऑइल मिल्समधून २१८.४ किलो कोल्ड प्रेस्ड शेंगदाणा तेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत ८४ हजार रुपये आहे. हे तेल निकृष्ट दर्जाचे असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. या तीन आस्थापनांमधून एकूण ३,७५३.६ किलो तेल जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ७,९१,३०८ रुपये आहे.

पुणे जिल्ह्यात ३४ हजार किलो तेल जप्त

पुणे जिल्ह्यातील आठ आस्थापनांवर कारवाई करून ३४,४८१.१ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे ५८.९० लाख रुपये आहे. शहरातील तीन आस्थापनांव्यतिरिक्त बारामती, चाकण, जुन्नर, मुळशी आणि देहू येथील आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली.

जुन्नर येथील लक्ष्मी एंटरप्रायझेसमधून १२,४३४.३ किलो सोयाबीन आणि पामोलीन तेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत १९.०५ लाख रुपये आहे. देहू येथील संत तुकाराम ऑइल मिलमधून १२,५१८.६ किलो सोयाबीन आणि आयात केलेले आरबीडी पामोलीन तेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत १९.३८ लाख रुपये आहे. या दोन्ही आस्थापनांमध्ये तेलाच्या गुणवत्तेबाबत संशयास्पद बाबी आणि नियमांचे उल्लंघन आढळले.

जप्त केलेले तेल निकृष्ट दर्जाचे किंवा असुरक्षित असल्याचा संशय असला, तरी त्याची गुणवत्ता प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच निश्चित होणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे एफडीएकडून सांगण्यात आले. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रार किंवा गैरप्रकार निदर्शनास आल्यास ग्राहकांना १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा एफडीएच्या तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवता येईल.

Vedh News