पुणे – सोशल मीडियावरील रिल्सला लाईक आणि कमेंट्स करण्याच्या क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला आहे. डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या टोळक्यात दोन मुलींचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन येथील ‘फ्लाईंग जिप्सी’ या कॅफेमध्ये पहाटेच्या सुमारास पार्टी रंगली होती. याच दरम्यान रिल्सवरील लाईक आणि कमेंट करण्याच्या कारणावरून टोळक्यातील काही जणांचा एका तरुणाशी वाद झाला. यानंतर संतापलेल्या टोळक्यानं थेट कोयते काढून कॅफेमध्ये धुमाकूळ घातला आणि एका तरुणावर सपासप वार केले. या टोळक्यात दोन मुलींचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या थरारक प्रकारामुळे पार्टीत उपस्थित असलेल्या इतर तरुणांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि पळापळ झाली.
पहाटे चार वाजेपर्यंत कॅफे सुरू ठेवण्यास परवानगी कशी मिळते,थेट कॅफेमध्ये कोयते पोहोचतातच कसे ? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. याच ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये यापूर्वी तोडफोड आणि गैरवर्तनाचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणात डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांना २९ जून २०२६ रोजी निलंबित करण्यात आले होते. मात्र, घटनेची सत्यता तपासल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.
आता पुन्हा त्याच कॅफेमध्ये पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्टीदरम्यान कोयत्याने हल्ला झाल्याने डेक्कन परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
