गणेशोत्सवात भाविकांचे दागिने कटरने कापून चोरणारी टोळी गजाआड ; फरासखाना पोलिसांची कारवाई

गणेशोत्सवात भाविकांचे दागिने कटरने कापून चोरणारी टोळी गजाआड ; फरासखाना पोलिसांची कारवाई
Share

पुणे – गणेशोत्सवात भाविकांचे दागिने कटरने कट करुन चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीचा फरासखाना पोलिसांनी छडा लावला आहे. या टोळीतील एकाला पकडून त्याच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरट्याकडून २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

विजयपाल कवर सेन (वय ३४, रा. इस्लामपूर, घसौली, जि. शामली, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने व त्याच्या इतर पाच साथीदारांनी या चोर्‍या केल्या आहेत.

फिर्यादी सागर कोमटी व त्यांचा मित्र शिवाजी रोडवरील बेलबाग चौकात २५ सप्टेंबर रोजी रात्री पावण अकरा वाजता गणेशोत्सव विजय मिरवणुक पहात असताना त्यांना मारहाण करुन चाकूचा धाक दाखवुन त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरला. तसेच त्यांच्या गळ्यातील १ लाख २१ हजार रुपयांची ३८ ग्रॅमची सोनसाखळी जबरदस्तीने चोरुन नेली होती. फरासखाना पोलिसांनी ६ जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

तपास पथकातील पोलीस अंमलदार गजानन सोनुने व चेतन होळकर यांना गोपनीय बातमीवरुन हा गुन्हा उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील गुन्हेगारांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी विजयपाल कवर सेन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आणखी पाच साथीदारांसह हे गुन्हे केल्याचे कबूल केले. पोलीस पथकाने उत्तर प्रदेश येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. आरोपीकडून चोरी केलेले १३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चोरलेला मोबाईल, चाकू व कटर असा २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्या टोळीने केलेले चेनचोरी व मंगळसूत्र चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश् मुळे, राजेश महाला, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, नितीन तेलंगे, इरफान मोमीन, अमोल आवाड, नितीन जाधव, चेतन होळकर, श्रीकांत वाघवले, अजित शेख, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश राठोड, सुमित खुट्टे, ज्ञानेश्वर पांचाळ, प्रशांत पालांडे, महेश पवार, रजत राजेशिर्के, अविनाश दरवडे यांनी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करीत आहेत.

Vedh News