सीएसआर संबंधित सचिव म्हणून नियुक्ती झाल्याचे भासवून १ कोटी ४० लाखांची फसवणूक

सीएसआर संबंधित सचिव म्हणून नियुक्ती झाल्याचे भासवून १ कोटी ४० लाखांची फसवणूक
Share

पुणे- केंद्र आणि राज्य सरकारच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीशी संबंधित समितीमध्ये सचिव म्हणून नियुक्ती करण्याचे आणि निधीमधून कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवून वारजे भागात एका ५१ वर्षीय व्यक्तीची तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी अजय काशिनाथ गायकवाड (वय ५१, रा. वारजे माळवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गायकवाड यांची प्रकाशन संस्था आहे. राहुल तानाजी प्रधान ऊर्फ कांबळे असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे याने महाराष्ट्र शासनाच्या आदेशासारखा दिसणारा बनावट दस्तऐवज दाखवून या दस्तऐवजानुसार अटल पब्लिकेशन या संस्थेला २० कोटी रुपये मंजूर झाल्याचे भासवले. तसेच सीएसआर निधीशी संबंधित महाराष्ट्र समितीमध्ये सचिव म्हणून नियुक्ती झाल्याचे सांगून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधील कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

आरोपीने सेक्युरिटी डिपॉझिट आणि कमिशनच्या नावाखाली फिर्यादीकडून तब्बल १ कोटी ४० लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले. फिर्यादी गायकवाड यांनी हे पैसे गोळा करण्यासाठी कर्ज घेतले आणि स्वतःची मालमत्ता देखील गहाण ठेवली. जेव्हा फिर्यादीने कामाची विचारणा केली आणि पैसे परत मागितले, तेव्हा आरोपीने त्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे ४ चेक (एकूण २ कोटी रुपये) दिले, मात्र ते सर्व चेक बँकेत बाऊन्स झाले. यानंतर पैसे मागितल्यास आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली असा आरोप फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सध्या या व्यवहारांची, बँक खात्यांची आणि बनावट कागदपत्रांची पुढील चौकशी करत आहेत.

Vedh News