पुणे- म्हाडाच्या पुणे मंडळाने तब्बल ४४६२ घरांच्या संगणकीय सोडतीची घोषणा केली आहे. घरांच्या किमती सुमारे १३ लाख रुपयांपासून पुढे असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचे स्वप्नातील घर साकार होणार आहे.
या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची तारीख १६ सप्टेंबर २०२६ आहे. सोडतीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महापालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबवेवाडी, मुंढवा, उंड्री, वडगाव, बावधन आणि कोंढवा खुर्द आदी भागांमध्ये सदनिका उपलब्ध असून १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत मांजरी खुर्द, म्हाळुंगे आणि भूगाव येथे सदनिका मिळू शकतात. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव आदी भागांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती म्हाडाच्या वतीने देण्यात आली आहे.
सोडतीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे
अर्ज सुरू- २४ऑगस्ट २०२६
अर्जाची अंतिम मुदत- १५ सप्टेंबर २०२६
RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम – १६ सप्टेंबर २०२६
प्रारूप यादी – २९ सप्टेंबर २०२६
हरकती/दावे -१ ऑक्टोबर २०२६
अंतिम यादी -८ ऑक्टोबर २०२६
संगणकीय सोडत -१३ ऑक्टोबर २०२६
EWS आणि LIG साठी उत्पन्न मर्यादा
EWS (अत्यल्प उत्पन्न गट) : वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत
LIG (अल्प उत्पन्न गट) : वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ९ लाख रुपयांपर्यंत
पती-पत्नीचे एकत्रित उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे. उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदारांचा दाखला आवश्यक आहे.
अर्ज कुठे करायचा?
अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, अटी-शर्ती आणि माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. अधिकृत अर्ज आणि माहिती MHADA Housing Portal किंवा MHADA अधिकृत संकेतस्थळ येथे उपलब्ध आहे. अर्ज करण्यापूर्वी केवळ अधिकृत MHADA संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवा.
