पुणे – कात्रज घाट परिसरात भारतीय जनता पक्षाचे प्रचार साहित्य मोकळ्या जागेत फेकून दिल्याचा प्रकार समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या साहित्यामध्ये भाजपचे झेंडे, टोप्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट आढळून आले आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड ॲम्बेसिडर विक्रांत सिंग यांनी घटनास्थळी पाहणी करून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यांनी स्वतः पुढाकार घेत घाट परिसरातील टाकून दिलेले साहित्य गोळा करून स्वच्छता केली. संवेदनशील आणि निसर्गरम्य कात्रज घाटात अशा प्रकारे प्रचार साहित्याची विल्हेवाट लावणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रचारासाठी तयार करण्यात आलेले आणि वापरात न आलेले हे साहित्य योग्य पद्धतीने पुनर्वापर किंवा पुनर्विल्हेवाट करण्याऐवजी थेट मोकळ्या जागेत टाकण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत वनविभागाचे हवेली तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्याशी संपर्क केला असता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
