पिंपरी- जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय म्हणून लवकरच रुग्णसेवेत रुजू होणार असल्याची माहिती चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकर जगताप यांनी दिली. रुग्णालयातील १०० खाटांचा ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ महिन्याभरात कार्यान्वित करण्याचे निर्देश आमदार शंकर जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून या सुविधेमुळे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील नागरिकांना गंभीर आणि आपत्कालीन आजारांवरील अत्याधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, बर्न वॉर्ड, एसएनसीयू आणि अतिरिक्त आंतररुग्ण सुविधांच्या माध्यमातून आरोग्यसेवेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. सुपर स्पेशालिटी उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर नागरिकांना उपचारांसाठी खासगी अथवा दूरच्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही. सर्वसामान्य रुग्णांना सुलभ, दर्जेदार आणि वेळेत उपचार उपलब्ध करून देणारे प्रमुख आरोग्य केंद्र म्हणून जिल्हा रुग्णालय विकसित केले जाणार आहे. असेही आमदार जगताप यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा, अंतर्गत समस्या आणि प्रलंबित विकासकामांचा आमदार जगताप यांनी सोमवारी (ता. २४) संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. या वेळी त्यांनी एमआरआय, सीटी स्कॅन आणि एक्स-रे युनिटची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. यावेळी नगरसेविका तृप्ती कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त प्रदीप ठेंगल, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाग्यश्री थोपटे, उरो रुग्णालय अधीक्षक डॉ. अभिजीत होसमनी, अग्निशामक अधिकारी व्यंकटेश दुर्वास, उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ. देविदास शेलार, राष्ट्रीय आरोग्य अभियान उपअभियंता मंदार कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभाग सहायक अभियंता प्रतीक्षा काळे (सिव्हील) , तानाजी थोपटे (इलेक्ट्रिक), अभियंता अनिल गाडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र भरातून येणाऱ्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय आरोग्य सेवेसाठी मोठा दिलासा देणारे रुग्णालय ठरत आहे. याच रुग्णसेवेला नव्याने सुरू करण्यात येत असलेले १०० बेड अधिक चांगली आरोग्य सेवा देतील. या १०० बेडच्या माध्यमातून येथे येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा तात्काळ मिळेल असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.
या रुग्णालयात दोन ऑपरेशन थिएटर, आय.सी .यु, अत्याधुनिक वॉर्ड आणि ओपीडीची सुविधा दिली जाणार आहे. उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) क्षमता वाढवावी. उपलब्ध मनुष्यबळ आणि वैद्यकीय यंत्रसामग्रीचे योग्य नियोजन करून रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा वेळेत मिळतील, याची दक्षता घ्यावी, असे जगताप यांनी सांगितले.
