सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस
Share

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अचानक धाड टाकून धडक कारवाई केली आहे. 

या तपासणीदरम्यान अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी एफडीएच्या पथकाने भाजी व विविध मसाल्यांचे सॅम्पल जप्त केले आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत स्पष्टीकरण मागवण्यासाठी कॅन्टीन चालकाला येत्या ८ तारखेला एफडीएच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रयोगशाळेकडून अन्नाच्या सॅम्पल्सचा तपासणी अहवाल आल्यानंतर कंत्राटदारावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार (FSSAI) पुढील कठोर कारवाई किंवा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया केली जाईल.

एफडीएच्या या धाडीमुळे कॅन्टीन कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. विद्यापीठ परिसरातील इतर वसतिगृहे आणि विभागांमधील कॅन्टीनचीही लवकरच विशेष पथकाद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे संकेत एफडीए प्रशासनाने दिले आहेत.

एफ डी ए च्या कारवाईनंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समिती SPPU युनिटच्या उपाध्यक्ष प्रतीक्षा वाघमारे म्हणाल्या, “१५ दिवसापासून मुलींच्या वसतिगृहामध्ये ५ वी घटना आहे. जेवणामध्ये हानिकारक पदार्थ आढळल्याची आम्ही या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा विद्यापीठामार्फत या मेस व उपाहारगृह चालकावरती कारवाई होत नव्हती. त्यामुळे आम्ही FDA तक्रार केली. त्या प्रमाणे FDA चे अधिकारी तपासणीसाठी आले होते त्यांना अनेक गैरप्रकार आढळले. आम्हाला FDA वरती विश्वास आहे. अशा मेस चालकावर कारवाई होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण जेवण मिळेल.

दरम्यान, “वसतिगृहातील विद्यार्थिनींना स्वच्छ, ताजे आणि गुणवत्तेचे अन्न मिळणे हा त्यांचा हक्क आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणतीही गय न करता कडक कारवाई केली जाईल.”असा इशारा एफडीए ने दिला आहे.

Vedh News